Buddha Jayanti (Anniversary) and its Political Importance

Buddha Jayanti (Anniversary) and its Political Importance

Buddha

Buddha. Image by wikimedia.org

बुद्धजयंती आणि तिचे राजकीय महत्व
(Buddha Jayanti (Anniversary) and its Political Importance)

Janata, 17th May 1941

Dr. Babasaheb Ambedkar : Writings and Speeches Volume 20
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता, १९२९ ते १९५६,
लेख क्र. ९४, पान न. ३२७-३३५

Dr. Babasaheb Ambedkar : Writings and Speeches Volume 20


हिंदुस्थानातील लोक उत्सवप्रिय आहेत हे काही कोणास सांगावयास नको. वर्षातून अर्धे अधिक त्यांचे दिवस उत्सवात आणि सणात जातात. त्यातल्या त्यात देशातील महान व्यक्तींच्या जन्म-मरणाच्या उत्सवांना तर ते फारच महत्व देतात. कृष्णजन्माष्टी, रामनवमी, हनुमानजयंति हे उत्सव त्यांच्या या मनोभावनेची साक्ष देतात. असे असताना हिंदुस्थानातील हिंदू लोक बुद्धाची जयंती साजरी करीत नाहीत याचे कोणाही परकीय माणसास आश्चर्य वाटल्यावाचून राहात नाही. ज्या विभूती हिंदुस्थानात निर्माण झाल्या त्यात बुद्धाचे स्थान फार उच्च प्रतीचे आहे. जगाला प्रकाशित करणारा तेजस्वी सूर्य अशी महती गाणारे बुद्धाचे काही भक्तगण आहेत. ख्रिस्ती लोक, ज्यांना बुद्धाबद्दल हेवा वाटतो, ते देखील एशिया खंड प्रकाशित करणारा सूर्य अशी त्यास उपमा देतात. हिंदू लोकही त्याला विष्णूचा अवतार मानीत असत. अशा या विख्यात पुरुषाची या देशातील लोकांना आठवण देखील राहिली नाही. बाजीरावाने ठेवलेली रांड मस्तानी हिचे नाव ज्यांना माहित आहे, असे सामान्य लोक आज पुष्कळ सापडतील. पण बुद्धाच्या नावाचा परिचय असलेले सामान्य लोक यांच्यापेक्षा फारच कमी सापडतील अशी मला शंका वाटते. एवढया मोठया विभूतीची एव्हढी मोठी विस्मृती व्हावी, हि मोठी सखेदाश्चार्याची गोष्ट आहे. अशा परिस्थितीत आनंदाची हि गोष्ट की, बंगाल व इतर प्रांतात बुद्धजयंतीचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. पण आमच्या मते या उत्सवाला फारच मोठे राजकीय महत्व आहे. ते पटवून देण्याकरिता गौतमबुद्धाचे चरित्र व त्याचे कार्य यांचा जनतेला परिचय करून देण्याचे आज आम्ही योजिले आहे.

अडीच हजार वर्षापूर्वी शुद्धोधन नावाचा साक्य वंशातील एक राजा कपिलवस्तू येथे राज्य करीत होता. शुद्धोधन राजाच्या कुळाचे नाव गौतम असे होते. कपिलवस्तू हे ठिकाण आजच्या हिंदुस्थानातील संयुक्त प्रांत म्हणतात त्या प्रांतात होते. ते वस्ती व अयोध्या यांच्या मधोमध असून फैजाबादपासून पूर्वेकडे ५० मैलावर  होते. शुद्धोधन राजाच्या दोन पत्नी होत्या. एकीचे नाव मायादेवी व दुसरीचे नाव प्रजापति असे होते. शुद्धोधन व मायादेवी यांचे लग्न झाल्यावर काही दिवसांनी मायादेवी गरोदर राहिली. गरोदर राहिल्यानंतर पहिले बाळंतपण माहेरघरी व्हावे, अशी पूर्वापार चाल असल्या कारणाने मायादेवीचा बाप सुबुद्ध याने मुलीस  बाळंतपणास आपल्या गावी पाठवावी म्हणून त्यांचा जावाई शुद्धोधन यास निरोप पाठविला. त्याप्रमाणे मायादेवी व तिची बहीण प्रजापति या उभयता लवाजम्यानिशी आपल्या माहेरी जावयास निघाल्या. वाटेत त्यांना लुम्बिनी वन लागले. व त्या ठिकाणी मायादेवी हिस प्रसूतिवेदना सुरु झाल्या व त्या वनात ती बाळंत होवून पुत्ररत्न प्रसवली. प्रसूत झाल्या बरोबर मायादेवी मरण पावली. व त्या मुलाचे संगोपन तिची बहिण प्रजापति हिने केले. त्याचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले. हाच पुढे   गौतमबुद्ध म्हणून प्रसिद्धीस आला.

क्षत्रिय कुळात व राजघराण्यात जन्माला आल्यामुळे त्याच्या परिस्थितीला साजेल असे शिक्षण सिद्धार्थाला देण्यात आले होते. क्षत्रियाचे लष्करी शिक्षणच देण्यात आले होते असे नव्हे तर त्याचा वेदाभ्यासही चांगलाच झाला होता. परंतु सिद्धार्थाचा एकंदरीत मनाचा कल एकांताकडे होता. राजवैभव उपभोगण्याकडे त्याचा विशेष कल नव्हता. आपला पुत्र कदाचित सन्यास घेऊन भलत्याच मार्गाला लागेल या भीतीने शुद्धोधनाने आपल्या मुलाचे लग्न  करून त्यास संसारात डांबून टाकण्याचा निश्चय केला. व त्याप्रमाणे दंडपाणी याची मुलगी, जिचे माहेरचे नाव गोपी व सासरचे नाव यशोधरा, हिच्याबरोबर लग्न लावून दिले. व या लग्नापासून सिद्धार्थ गौतमास राहुल या नावाचा एक मुलगा झाला. शुद्धोधनाने आपल्या मुलाला ऐषआरामात राहाता यावे म्हणून तीन मोठमोठे राजवाडे बांधून दिलेले होते. त्याच्या ऐषआरामात कोणत्याही प्रकारची न्यूनता राहू नये, अशा प्रकारची व्यवस्था केली होती.

एके दिवशी गौतमाने गावातून हिंडून येण्याचा व एकंदरीत सामाजिक परिस्थिती पाहून येण्याचे ठरविले व त्याप्रमाणे रथ जुंपून तो राजवाड्यातून बाहेर पडला. शहरात शिरल्यानंतर चार गोष्टी त्याच्या नजरेस पडल्या. (Later Dr. Ambedkar discovered the truths and included those facts in his world famous book ‘The Buddha and His Dhamma‘. – Admin, http://ambedkar.navayan.com ) प्रथम एक अत्यंत वृद्ध, जराग्रस्त, गलितगात्र, दंतभग्न, चेहऱ्यावर सुरकत्या पडलेल्या, केस सगळे पांढरे झालेले, पाठीची कमान झालेली, हातात काठी धरून मुंगीच्या मंदगतीने तोंडातून काहीतरी अस्पष्ट बोलत व सर्व शरीर कंपायमान होत असलेला त्याच्या नजरेस पडला. पुढे गेल्यावर त्याला दुसरे दृश्य दिसले. एक माणूस भयंकर तापाने ग्रस्त झालेला, अत्यंत अशक्त व बेशुद्ध, निराश्रित असा वाटेवरती पडलेला दिसला. आणखी पुढे गेल्यावर एका माणसाचे प्रेत तिरडीवर घालून त्याचे नातेवाईक व त्याचे मित्रगण वाहून नेत होते. त्याच्यापुढे एक संन्यासी प्रफुल्ल मनाने व शांत चित्ताने हातात भिक्षापात्र घेऊन चालला होता हे चौथे दृश्य पहिले. ही चार दृश्ये पाहून गौतमच्या मनावरती मोठाच परिणाम झाला. या चार दृश्यांवरून त्याने बोध घेतला (तो हा) की जगात दु:ख आहे. मनुष्य जीवीत हे अशाश्वत आहे. असे जर नसते तर उपजलेला मनुष्य रोगग्रस्त न होता ! वृद्ध न होता !! आणि मरण न पावता !!! एकंदरीत चौथे दृश्य म्हणजे सन्यासवृत्ती हेच खरे ध्येय होय असे त्यास वाटले. आणि म्हणून ज्या जगात दु:ख आहे, जरा आहे, आणि मरण आहे अशा संसारात काहीच अर्थ नाही, असे त्यास वाटू लागले. अशा विचारांच्या जाळ्यात सापडून तो परत घरी आला. परत येताच त्याची पत्नी यशोधरा प्रसूत होऊन तिला एक मुलगा झाल्याचे वृत्त त्यास कळविण्यात आले. ही एक जादा बेडी आपल्या पायात पडली, असे त्यास वाटले. तथापि सन्यास घेण्याचा त्याचा निश्चय कायम झाला होता. व त्याप्रमाणे त्याने आपला निश्चय त्याचा बाप शुद्धोधन यास जाऊन कळविला. अर्थात गौतमाने असे काही करू नये म्हणून राजवाड्यामध्ये नाना तऱ्हेचे करमणुकीचे, मनोरंजनाचे प्रयोग करून या निश्चयापासून गौतमास परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु गौतमाचा निश्चय (पक्का) झालेला होता. तथापि राजाला कळविल्याखेरीज पळून जाणे योग्य नाही, म्हणून आपला मनोदय अमलात आणण्याचा आपण निर्धार केला आहे, हे सांगण्याकरिता तो राजवाड्यात गेला आणि बापास म्हणाला की, “मला तुम्ही अडथळा करू नका. तुमचे राज्य, तुमचे प्रजाजन, तुमची संपत्ति तुम्ही घ्या. मला काही नको.” दुसऱ्या दिवशी शुद्धोधनाने आपल्या सरदारांची बैठक बसविली व त्यात गौतमाने केलेल्या निश्चयाची बातमी त्यांस दिली. हे कळल्याबरोबर सरदार म्हणाले, “आम्ही त्याच्यावरती पहारा ठेवू. तो आपल्या हातांतून कसा जाईल? हे आम्ही पाहू.” अर्थात अशा कडेकोट बंदोबस्तात निघून जाणेच शक्य नव्हते म्हणून त्याने तो दिवस तसाच जाऊ दिला. मध्य रात्री तो जागा झाला व त्याचा घोडेवाला चंडक यास झोपेतून उठवले व त्यास, “मला जावयाचे आहे, माझ्या घोड्यास घेऊन ये” असे सांगितले. चंडक, त्यास प्रथमत: कबूल होईना व गौतमास जाऊ नको म्हणून गळ घालू लागला. परंतु गौतमाचा निश्चय अढळ आहे असे दिसल्यावर त्याचा घोडा कथक यास तो घेऊन आला. गौतमाने त्याची बायको व मूल ज्या खोलीत झोपली होती त्याचे दार हळूच उघडून त्यांच्यावर शेवटची नजर टाकून कथकावर स्वार होऊन त्या रात्री तो कपिलवस्तु सोडून गेला.

गृहत्याग केल्यानंतर गौतमाने दोघा गुरूंचे शिष्यत्व पत्करून जगात दु:ख का? या प्रश्नाचे उत्तर मिळते का हे पाहण्याचा प्रयत्न केला. पहिल्या प्रथम आराद कलाम व त्यानंतर उद्रक रामपुत्र यांचे शिष्यत्व त्याने पत्करले. अशा परी सात वर्षे त्यांच्या सान्निध्यात त्याने घालविली. परंतु त्यांच्या उपदेशापासून त्याचे समाधान झाले नाही. म्हणून त्यांना सोडून तो मगध देशात उरुवेल (ज्याला हल्ली बुद्धगया असे म्हणतात) त्या ठिकाणी येऊन राहिला. त्या ठिकाणी त्याच्यासारखेच संसाराला सोडून आलेले पांच संन्यासी अरण्यवास पत्करून बसले होते. त्यांच्याबरोबर गौतमाने देहदंडन व खडतर तपश्चर्या करण्यास सुरवात केली. सहा वर्षांच्या देहदंडनाने त्याचे शरीर अत्यंत कृश झाले व त्याला चालण्याची शक्तीदेखील राहिली नाही. एके दिवशी जवळून वाहत असलेल्या फल्गु नदीतून स्नान करून परत आपल्या आश्रमात येत असताना तो वाटेत घेरी येऊन पडला. जवळच एक धनगर रहात होता, त्याची वडील मुलगी सुजाता हिने गौतमास त्या स्थितीत पहिले व त्याला घरून दूधभात आणून दिला. शुद्धीवर आल्यानंतर वाटू लागले की, देहदंडनापासून जगात दु:ख का याचे ज्ञात होणे शक्य नाही. गौतमाने अन्न सेवन केले यामुळे तो योगभ्रष्ट झाला अशी कल्पना करून घेऊन त्याचे पाच सोबती त्यास सोडून गेले व त्या बुद्धगयेत बुद्ध एकटा राहिला.

एके रात्री एका वृक्षाच्याखाली गौतम बसला असताना या जगात दु:ख का व ते दु:ख नाहिसे करण्याचा मार्ग कोणता या प्रश्नाचा त्याला उलगडा झाला. त्याला दिसले की, मानवी जीवनक्रमाचे दोन प्रचलित मार्गाने लोक चालले आहेत. एक चैन करून कालक्रमणा करणे हा, दुसरा देहदंडन करून मरण्याची अपेक्षा करीत राहणे हा. हे दोन्ही मार्ग चुकीचे आहेत. या दोन्ही मार्गांनी संसारातील मानवाचे दु:ख हरण होणे शक्य नाही. अशी दिव्य दृष्टी त्या रात्री त्या वृक्षाखाली बसला असताना गौतमाला झाली. या दिव्य दृष्टीने गौतम ज्ञानी झाला म्हणून लोक त्याला बुद्ध (ज्ञानी) म्हणू लागले आणि ज्या वृक्षाखाली त्याला ज्ञान झाले त्या वृक्षाला बोधिवृक्ष असे जगप्रसिद्ध नाव प्राप्त झाले.

या नवीन दिव्य दृष्टीचा असा परिणाम झाला की, बुद्धाने देहदंडन सोडून दिले. तो संसारात पुन्हा पडला नाही. पण तो पुन्हा समाजात आला व समाजाच्या उद्धारार्थ त्याने धर्म संस्थापनेचे कार्य आरंभिले. सर्व हिंदुस्थान पायाखाली घालून आबाल वृद्धास, स्त्रीपुरुषास आपला धर्म त्याने स्वमुखाने सांगितला. हे कार्य त्याने तब्बल चाळीस वर्ष केले. अखेर धर्मप्रचाराकरिता फिरत असताना बुद्ध पावा येथे मुक्कामास राहिला. त्या गावी चुडा नावाचा एक लोहार रहात असे. त्याने बुद्धास आपल्या घरी जेवण्याकरिता येण्याचा आग्रह केला. चुडा याच्या घरचे ते अन्न त्याला जाचले व तो आजारी झाला. तशाच आजारीस्थितीत बुद्ध नेपाळच्या पूर्व भागी असलेल्या कुशीनारा गावी गेला व त्या ठिकाणी त्याचा अंत झाला.

बुद्धाचे कार्य

बुद्धाच्या धर्माची मूल तत्वे काय? त्याने कोणते कार्य साधले याचे आकलन झाल्याखेरीज बुद्धाचे महत्व कळून येणार नाही. या प्रश्नाचा सविस्तर खुलासा स्थळ संकोचामुळे या ठिकाणी करता येणे शक्य नाही. परंतु थोडक्यात बुद्धाच्या कार्याची कल्पना करून देता येणार नाही, असे मात्र म्हणता येणार नाही. बुद्धकालीन ब्राह्मणी धर्माचे तीन आधारस्तंभ होते. वेद्प्रामान्य हा पहिला आधारस्तंभ, यज्ञ बलिदान हा दुसरा आणि वर्णाश्रम हा तिसरा. वेदात असेल ते सारे खरे, सत्य बुद्धीला पटो अगर न पटो.  वेदात असेल ते सारे खरे, हा जो ब्राह्मणी धर्माला आधारस्तंभ वाटत असे, त्याला बुद्ध मनुष्याच्या ज्ञान मार्गातला पहिला धोंडा असे मानीत होते. वेदात असेल ते खरे, या ब्राह्मणी धर्माच्या तत्वाविरुद्ध ज्ञानाला पटेल तेच खरे असे बुद्धाचे तत्व होते. ब्राह्मणी धर्मात परमेश्वरप्राप्ती हा धर्माचा हेतू असे मानले जात असे. परमेश्वराला बलिदान दिल्याखेरीज त्याची प्राप्ती होऊ शकत नाही, म्हणून यज्ञ करणे व त्यात बळी देणे हाच खरा धर्म मानला जात असे. अगदी पूर्वी ब्राह्मणी धर्मात मनुष्याचा बळी यज्ञात देत असत व त्या नरबळीचे मांस यजमानास खावे लागत असे. नरबळीची चाल जरी बुद्धाच्याकाळी बंद पडली होती तरी यज्ञात पशुचा बळी देण्याची चाल जारी होती. त्याकाळचे वाड्मय ज्यांनी वाचले असेल त्यांना आजच्या ब्राम्हणांचे पूर्वज असंख्य गाईंचा यज्ञाकरिता कसा संहार करीत असत हे माहित असेलच. हे वाड्मय वाचून जेवढ्या गाई ब्राम्हणांनी यज्ञात कापल्या असतील त्याच्या शतांशाने मुसलमानांनी कापल्या असतील काय, याबद्दल संशय उत्पन्न होतो. जसा वेद्प्रामाण्यावर बुद्धाने हल्ला चढविला, तसा त्याने यज्ञावरती हल्ला चढविला. बुद्धाची या बाबतीतील भूमिका अत्यंत क्रांतीकारक होती असेच म्हटले पाहिजे. धर्माचा आणि परमेश्वर प्राप्तीचा काही संबंध नाही असा बुद्धाचा पक्ष होता. मनुष्याने मनुष्याशी कसे वागावे ह्याचे योग्य प्रकारचे बंधन घालून देणे हे धर्माचे क्षेत्र आहे. ही बुद्धाची भूमिका होती. परमेश्वर प्राप्ती हे धर्माचे क्षेत्र आहे, ही भूमिका बुद्धाला कबूल नव्हती. एका बाजूने परमेश्वर प्राप्तीसाठी यज्ञ करावयाचा, आणि दुसऱ्या बाजूने आपल्या शेजाऱ्याला छळावयाचे, त्याला उपद्रव होईल असे वर्तन करावयाचे, ही धर्माची विटंबना आहे असे बुद्धाचे म्हणणे होते. ब्राह्मणी धर्माचा तिसरा आधारस्तंभ जो वर्णाश्रम धर्म त्याच्यावर तर बुद्धाने फारच मोठा मारा केला.  ब्राह्मणी धर्माची सारी मख्खी या वर्णाश्रम धर्माच्या कल्पनेत सामावलेली आहे. जातीभेदाच्या जन्मजात उच्चनीच कल्पनांचा फैलाव होण्यास वर्णाश्रम धर्मच कारणीभूत ठरला आहे. या ब्राह्मणी धर्मात स्त्रिया व शूद्रांना मनाचे स्थान नाही, उपजीविकेचे मार्ग मोकळे नाहीत, कशावर स्वामित्व नाही, म्हणून या दोन वर्गाना स्वातंत्र्य नाही. ही त्यांची जिवंतपणीची अवदशा. ही अवदशा मेल्यानंतरही त्यांच्या पाठी आहेच!  ब्राह्मणी धर्मात स्त्रियांना व शूद्रांना मेल्यावर मोक्ष नाही. कारण  ब्राह्मणी धर्माच्या तत्वाप्रमाणे ज्याला सन्यास घेता येतो त्यालाच मोक्ष प्राप्त होऊ शकतो. आणि शूद्रांना व स्त्रियांना सन्यास देण्याची ब्राह्मणी धर्माने मनाई केलेली होती. बुद्धाला उच्चनीच भाव मान्य नव्हता. ‘ब्राह्मण झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ’ हे अघोरी तत्व मुळापासून खणून काढण्याचा बुद्धाने निकराचा प्रयत्न केला. सामाजिक समतेचा बुद्धाइतका मोठा पुरस्कर्ता जगात दुसरा झाला नाही असे म्हटले तरी त्यात अतिशयोक्ती झाली, असे कोणालाही म्हणता यावयाचे नाही. ब्राह्मण धर्मात स्त्रियांना मोक्ष नव्हता. पण बुद्धाने स्त्रियांना भिक्षुकिणी केल्या. ब्राह्मण धर्मात शूद्रांना मोक्ष नव्हता. बुद्धाने शूद्रांना भिक्षु केले. यावरून बुद्धा समतेच्या तत्वाचा नुसता पुरस्कार करून स्वस्थ बसला असे नाही, समता अमलात आणण्याचा त्याने प्रयत्न केला. नुसत्या स्त्रियांना व शूद्रांना भिक्षू केले इतकेच नव्हे तर अंत्यजानासुद्धा भिक्षूच्या उच्च पदावर चढविले.

वरील विवरण अगदी त्रोटक असले तरी बुद्धाने या देशात किती महत्वाची कामगिरी केली याची कल्पना वाचकांस येऊ शकेल असे आम्हास वाटते. बौद्ध धर्माची तत्त्वे जितकी ओजस्वी व कल्याणकारी होती तितकाच बौद्ध धर्माचा प्रसार अचाड प्रमाणात झाला. दक्षिणेकडे सिलोन व प्यासिफिक (Pacific) महासागरातील असंख्य लहानसहान बेटांतून बुद्धाच्या धर्माने आपले अधिष्ठान बसविले आहे. पश्चिमेस ब्रम्हदेश, आसाम, सयाम, चीन, जपान येथवर बुद्ध धर्माचा प्रसार झाला. उत्तरेस तिबेट, नेपाळ, तुर्कस्तान येथवर त्याने मजल मारली. इतकेच नव्हे तर अफगाण लोकांना बौद्ध धर्मीय केले. इतका प्रसार कोणत्याही धर्माचा झाला नाही. बुद्धाच्या धर्माचा आणखी एक विशेष सांगण्यासारखा आहे. सर्वच धर्म आपल्या गुणांच्या आश्रयाने प्रसार पावलेले नाहीत. मुसलमानी धर्म तलवारीच्या जोरावर वाढला. ख्रिस्ती धर्म कायद्याच्या जोरावर वाढला. फक्त एकट्या बुद्धाच्या धर्माचा प्रसार गुणांमुळे झाला. त्याला तलवारीच्या धारेची अगर कायद्याच्या दंडनाची जरुरी लागली नाही. लोकांना धरून आणून बुद्धाच्या धर्माची दीक्षा देण्याचे कारण पडले नाही. लोकांनी आपण होऊन त्यात उडी घेतली.

असे असताना बुद्धाच्या नावाची विस्मृती लोकांना कशी झाली असा प्रश्न उपस्थित होतो. हिन्दुस्थानाबाहेर बौद्ध धर्म अजून जिवंत आहे. त्याची संख्या काही कमी नाही. हिंदुस्थानातून त्याचे उच्चाटन झाले. त्याची करणे आज येथे स्थलसंकोचामुळे देता येत नाहीत. परंतु त्याचे थोडक्यात दिग्दर्शन करणे अवश्य आहे. बुद्धाच्या नावाची विस्मृती काळाला शक्य नाही. बुद्ध अजरामर, अमर आणि अकाल आहे. त्याच्या नावाचा लोप काल कसा करू शकेल? बुद्धाची विस्मृती चीनमध्ये झाली नाही, जपानमध्ये झाली नाही, ब्रम्हदेशात झाली नाही. फक्त हिंदुस्थानातच झाली. याला काल कारण नसून बुद्धाचे शत्रू कारणीभूत आहे हे उघड आहे. ब्राम्हण हे एकजात बुद्धाचे शत्रू. ब्राम्हणांचे भांडण काही बुद्धांशीच होते असे नाही. त्यांचे जैन धर्माचा संस्थापक महावीर याच्याशीही भांडण होते. बुद्धाप्रमाणे महावीर हाही यज्ञाच्या विरुद्ध होता. पण ब्राम्हणांनी जसा बुद्धांवर निष्ठूरपणाचा व निकराचा हल्ला केला तसा महाविरावर केला नाही. याचे कारण बुद्ध जसा चातुर्वर्ण्याच्या विरुद्ध होता तसा महावीर नव्हता. बुद्धाच्या वेदनिंदेबद्दल ब्राम्हणांना जरी विषद वाटत असे तरी त्यांना त्याची विशेष चीड नसे. वेदाचे प्रामाण्य गेले तरी त्यात ब्राम्हणांचे मोठेसे नुकसान नाही. तसेच काहीसे यज्ञसंबंधाने त्यांना वाटे. यज्ञ राहिला तरी ठीक, गेला तर त्यात काही मोठी आपत्ती ओढवणार नाही, असे त्यांना वाटे. पण चातुर्वर्ण्यासंबंधी मात्र त्यांची मनोदिशा निराळ्या प्रकारची होती. चातुर्वर्ण्य गेले तर ब्राम्हण गेले, हे त्यांनी ओळखले होते. अर्थात चातुर्वर्ण्याला ते आपला प्राण समजत. बुद्धाची चातुर्वर्ण्य विध्वंसनाची मोहीम म्हणजे ब्राम्हणांना ‘मुले कुठार’ असे वाटणे साहजिक आहे. ती त्या काळची ब्राम्हण-ब्राम्हणेतर चळवळ होती असे म्हणावयास काहीच हरकत नाही व त्या चळवळीचा अधिष्ठाता जो बुद्ध, त्याला ते मांग अथवा कालपुरुष लेखीत असत. त्यांचा नायनाट करण्यासाठी त्यांनी होते नव्हते तितके सर्व उपाय केले. आपले वैदिक देव ब्रह्मा, विष्णू, महेश यांना बाजूस सारून क्षत्रिय राजांना देव करून बुद्धाची चळवळ त्यांनी मारली. क्षत्रिय रामाला, ब्राम्हण आज जसे जेध्यांना भजतात तसे भाजू लागले. एकट्या रामाला हाताशी धरून कार्य होत नाही असे दिसताच दुसऱ्या एका क्षत्रिय राजाला-कृष्णाला पुढे करून ब्राम्हणांनी त्याला देव बनविला. ब्राम्हण आपल्याच राजांना भजू लागले. आता ब्राम्हणांच्या विरुद्ध मोहीम चालू ठेवण्यास कारण नाही अशी वृत्ती ब्राम्हणेतरात उत्पन्न करून, बुद्धाने आरंभिलेल्या ब्राम्हणेतर चळवळीची धार ब्राम्हणांनी काढून टाकली व तिला बोथट केली. बुद्ध तुमचा खरा, पण आम्ही देखील त्याला आमच्या विष्णूचा दहावा अवतार मानतो, असे ब्राम्हण म्हणू लागले. जनता खूष झाली. आमच्या बुद्धाला ब्राम्हणांनी दहावा अवतार मानला. झाले! आता ब्राम्हणांशी भांडवयाचे कारण काय? एकीकडून ब्राम्हणेतर जनतेशी सामदाम केला. दुसरीकडून बुद्धाचे अनुकरण करून आणि ब्राम्हण धर्म व बुद्ध धर्म एकच अशी लोकांची दिशाभूल करण्यास ब्राम्हणांनी सुरवात केली. बुद्धाने विहारे बांधली. विहारे ही बुद्ध धर्माची लोकांच्या दृष्टीने जागती ज्योत खूण. बुद्धाच्या विहारांच्या शेजारीच ब्राम्हणांनी आपली विहारे बांधण्यास सुरवात केली. या बाह्यात्कारी साम्यामुळे लोकांच्या मनातून बौद्ध धर्म व ब्राम्हणी धर्म या दोहोंमधील फरक दिसेनासा होऊन धर्माच्या बाबतीत पृथकपणा जाऊन सबगोलंकार झाला. शेवटी मुसलमानांच्या स्वाऱ्यानी बुद्ध विहारांचा विध्वंस केल्यानंतर जेव्हा बुद्ध भिक्षु देश सोडून गेले तेव्हा त्यांच्या गैरहजेरीत ब्राम्हणांनी बुद्धाच्या नावाचा समूळ लोप करण्याच्या उद्देशाने बुद्ध विहारांना पांडव लेणी म्हणू लागले व बुद्धांच्या मूर्ती फोडून त्या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना करू लागले.

ब्राम्हणांनी बुद्धाचे नाव या देशातून धुवून काढण्याचा प्रयत्न करावा हे समजण्यासारखे आहे. तो त्यांचा बोलूनचालून शत्रूच होता. त्याची जयंती करावी असा विचार त्यांना कसा रुचेल? परंतु ज्या ब्राम्हणेतरांच्या हिताकरिता त्यांना अंधश्रद्धेच्या तावडीतून सोडविण्याकरिता, जंतर मंतरच्या खोट्या धर्माच्या कचाट्यातून मोकळे करून खऱ्या मानवी धर्माच्या मार्गावर आणण्याकरिता, त्यांची माणुसकी प्रस्थापित करण्याकरिता, त्यांचा स्वाभिमानदीप प्रज्वलित ठेवण्याकरिता जो झटला, ज्याने ब्राम्हणेतर जनतेच्या हिताकरिता राज्यवैभावाचा त्याग केला, ज्याने आपल्या कीर्तीने देशाचा लोकिक वाढविला अशा महापुरुषाला ब्राम्हणेतरानी समूळ विसरून जावे, ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यांनी तरी बुद्धाची स्मृती जिवंत ठेवणे अवश्य होते.

बुद्ध जयंती साजरी करा असे हिंदुमात्रास सांगावयास आम्हाला हे एकाच कारण आहे असे कोणी समजू नये. आमचे मुख्य कारण यापेक्षा भिन्न असून सबळ आहे असे आम्हास वाटते. हिंदूतील सुशिक्षित लोकांना राजकारणात हिंदु संकृतीच्या पायावर व हिन्दूकरता लोकशाही प्रस्थापित करण्याची इच्छा उत्पन्न झाली आहे व त्या प्रीत्यर्थ त्यांचे सारे प्रयत्न चालू आहेत. असल्या हिंदु लोकांच्या बुद्धीची आम्हास कीवच येते. या देशात लोकशाही प्रस्थापित करू असे म्हणणारे लोक एक तर मूर्ख तरी असले पाहिजेत किंवा लबाड तरी असले पाहिजेत. परंतु ही लबाडी व हा मूर्खपणा फार दिवस चालणार नाही. अनुभवाची गाठ पडल्यानंतर असे दिसून येईल की, ब्राम्हणी धर्म आणि लोकशाही ह्या परस्परविरोधी, एकमेकास विरोधी गोष्टी आहेत. लोकशाही हवी असेल तर चातुर्वर्ण्य नाहीसे झाले पाहिजे. हे चातुर्वर्ण्याचे जंतु काढून टाकण्याकरिता बुद्धाच्या तत्वज्ञानासारखे मारक रसायन नाही, असे आम्हास वाटते. म्हणून आम्ही म्हणतो की, राजकारणाची रक्तशुद्धी करण्याकरिता बुद्धजयंती सर्व हिंदुनी साजरी करणे हितावह व आवश्यक आहे.

हिंदुस्थान देश आज राजकीय दृष्ट्या रोगी माणसासारखा आहे. हिंदुस्थानची आठवण झाली म्हणजे पोट वाढलेले, हातापायांच्या कट्याकुट्या झालेल्या, चेहरा फिकट झालेला, डोळे आत गेलेले, हाडांचा सांगाडा झालेल्या पुरुषाचे चित्र नजरेसमोर उभे राहते. याला लोकशाहीचा गाडा चालविण्याची ताकद नाही, पण लोकशाहीचा गाडा चालविण्याची मोठी हौस. हौस पुरवायची तर त्याला ताकद आवश्यक आहे. ती औषध घेतल्याशिवाय प्राप्त होणे शक्य नाही. पण औषध घेऊन काय उपयोग? सर्वाना माहित आहे की, कोणतेही औषध घेण्यापूर्वी कोठा साफ करावा लागतो. त्यातील मळ घर करून बसला आहे. जो वैदू हा मळ धुवून काढील तोच या देशाला लोकशाहीच्या प्रस्थापानेत मदत करू शकेल. तो वैद्य म्हणजे गौतम बुद्ध हाच एक आहे. हिंदूंची रक्तशुद्धी रामाची जयंति करून होणार नाही. कृष्णाची जयंति करून होणार नाही किंवा गांधीची जयंति करून होणार नाही. राम, कृष्ण, गांधी हे ब्राम्हणी धर्माचे उपासक आहेत. लोकशाहीच्या प्राणप्रतिष्ठेला त्यांचा काही उपयोग नाही. उपयोग झाला तर एका बुद्धाचाच होऊ शकेल. त्याची आठवण घेणे आणि त्याचीच मात्र घेणे हाच एक हिंदुमात्राच्या राजकीय व सामाजिक रक्तशुद्धीचा उपाय आहे, असे आम्हास नि:संशय वाटते. म्हणजे

बुद्धं सरणं गच्छामि | 
धम्मं सरणं गच्छामि || 
संघं सरणं गच्छामि |||

हा महामंत्र त्यांनी जपावा असे आमचे सांगणे आहे.

7 Responses

  1. Piyush says:

    सिद्धार्थ गौतमाने ज्या कारणाने ग्रुहत्याग केला, ते कारण खुपच चुकीचे दिले आहे इथे! सिद्धार्थ गौतमाने ग्रुहत्याग रोहीनी नदीच्या पाणी वाटपावरुन जो वाद झाला होता, त्यामुळे ग्रुहत्याग केला होता. आणी मध्यरात्री पळुन जाउन नव्हे तर, सर्वांसमोर. मला एक सांगा, सिद्धार्थ गौतम जेव्हा 29 वर्षांचे होते तेव्हा ग्रुहत्याग केला मग,, त्यानी व्रुद्ध मानुस, आजारी मनुष्यास कधीच बघीतले नसेल?

  2. Surendra salve. says:

    Respected sir,the details u had posted r absolutily false/fak/unexceptable….pl.don’t give wrong mgs to people…i had just read starting 3 paragraph on gautam life…which is false…i din’t feel to read further….pl.go through buddha n his dhamma fr best knowledge…pl.stop this foolishness..hope u understand or be ready to pay fr dis….jay bhim.

    • JaiBhim Piyush and Surendra! Please refer the volume mentioned above. Later Dr. Ambedkar discovered the truths and included those facts in ‘The Buddha and His Dhamma‘. We will publish that too. And the article Dr. Ambedkar wrote, is to focus on Political Importance of Buddha Jayanti!

  3. rahul m s says:

    I’ve read this article in babasaheb ambedkar biography. It is an amazing article. thnx 4 giving this here.

  4. sunil Boudh says:

    This is eye-opening article by Babasaheb.Yes the reasons of Mahabhiniskramana (leaving royal palace) by Buddha are diffrent.Babasaheb had made correction in his The Buddha and His Dhamma.Leave aside the early part of the article stating the reasons of leaving royal palace but later part is really important to know and understand.Jai Bhim!

  5. sunil l maske says:

    i like very well

Leave a Reply to Amol Nirmala Waman Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *